हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूर, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सदर जिल्ह्यांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
येत्या आठवड्यात ५ ऑक्टोबरपर्यंत मुंबईत ३२ ते ३३ अंशांच्या आसपास कमाल तापमान राहील. या काळात ढगाळ वातावरण, हलका पाऊस किंवा शिडकाव्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याची जाणीवही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात गुरुवारनंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात किती पाऊस झाला?
यंदा महाराष्ट्रात एका जिल्ह्यात तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली. १८ जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस आहे. १७ जिल्हे सरासरीच्या श्रेणीत असून एकाही जिल्ह्यात पावसाची मोठी तूट नाही.
देशात सरासरी १०६ टक्के पाऊस
जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण Rain in next 3 days देशात सरासरी १०६ टक्के पाऊस पडला. या चार महिन्यांमध्ये सर्वसाधारण ८६८.६ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा तो ९२५ मिलिमीटर नोंदला गेला. मे महिन्याच्या अखेरीस नोंदवलेल्या दीर्घकालीन पूर्वानुमानामध्ये यंदा संपूर्ण देशात सरासरीइतका पाऊस पडेल, असा अंदाज होता. राज्यामध्ये एकूण २३ टक्के पाऊस सरासरीहून अतिरिक्त पडला. संपूर्ण देशाचा विचार करता पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये पावसाची तूट आहे. तसेच हवामान विभागाच्या वायव्य भारताच्या उपविभागातील उत्तर प्रदेशामध्येही पावसाची मोठी तूट आहे.